Saturday, 24 August 2013

दाभोलकरांचा विचार संपणार नाही....अतुल पेठे


Published: Sunday, August 25, 2013
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून म्हणजे एका विवेकी माणसाची अविवेकी माणसांनी केलेली हत्या होय. दाभोलकरांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. त्यातली पहिली गोळी ही विवेक संपवण्यासाठी, तर दुसरी गोळी विचार संपवण्यासाठी होती. या दोन्ही गोळ्यांमुळे दाभोलकरांचा मृत्यू झाला, म्हणजेच दाभोलकरांचा देह संपला; पण याचा अर्थ त्यांनी रुजवलेला विचार संपला असा नाही. मारणाऱ्या व्यक्तीला वाटते की माणूस संपला की विचार संपला; पण मारणाऱ्या व्यक्तीचे हे केविलवाणे अज्ञान असते. ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करायचा नसतो, त्याच व्यक्ती ही असली कृत्ये करतात. तोंडाला काळे फासणे, अ‍ॅसिड फेकणे, हातपाय तोडणे, प्रसंगी मारून टाकणे, असली कृत्ये ही भ्याड माणसे करतात. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधींचा खून किंवा सफदर हश्मी या लेखक- कलावंताचा खून, डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांच्या पुरोगामी विचारांचा सामना न करण्यातूनच झालेला आहे. इतिहासात असे विचार संपवण्याचे अनेक मार्ग लोकांनी विविध पद्धतीने अवलंबिलेले आहेत. तुम्ही विचार करता हाच त्यांच्या दृष्टीने मोठा गुन्हा असतो. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणे, ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणे, असे अनेक प्रकार आपल्याला आढळतात. गेल्या काही काळामध्ये समाजात वैचारिक अधिष्ठान लयाला जाऊन दांडगाईचे, गुंडपणाचे अधिष्ठान मुख्य बनले आहे. विचार करणाऱ्या माणसांविषयी घृणा उत्पन्न करणे हे अर्थातच एका मोठय़ा राजकारणाचा भाग असते. विचार करायला लावणारा माणूस हा आजूबाजूच्या माणसांना अज्ञानातून मुक्ती देत असतो, परिस्थितीची प्रखर जाणीव करून देत असतो. महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शूद्र आणि स्त्रियांबाबत मांडलेले विचार तत्कालीन समाजासाठी धक्कादायक होते. म्हणूनच त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला, प्रसंगी प्राणघातक हल्ल्यालाही सामोरे जावे लागले होते.
आता प्रश्न असा आहे, की कुणी म्हणेल, आम्ही पण विचार करतो. मग काही लोकांचा विचार महत्त्वाचा आणि काही लोकांचा विचार कमी महत्त्वाचा असे कसे? आपण वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे विचार हे पुरोगामी होते. पुरोमागी विचार असणे म्हणजे समाजाला प्रगतिपथावर नेणे. काळानुरूप होणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, तांत्रिक बदलांप्रमाणे पूर्वीच्या विचारांना मोडावे किंवा वाकवावे लागते. आज महत्त्वाची असणारी गोष्ट उद्या बिनमहत्त्वाची ठरू शकते. आपले जगणे याअर्थी प्रवाही असते. जगण्याचे जेव्हा डबके होते, तेव्हा त्या डबक्यामध्ये डास आणि अळ्या तयार होतात, पाणी खराब होते. जगणे जर प्रवाही व्हायचे असेल, तर नवे विचार आत्मसात करत ते पुढे न्यायला हवेत. काळानुरूप विचारांची, आपल्या आयुष्याची पुनर्माडणी करणे गरजेचे असते. आपल्या देशात विविध जाती, धर्म, पंथ यांचे वेगवेगळे समूह आपल्याला एकाच वेळेस लक्षात घ्यावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय घटना ही साऱ्या समूहांचा विचार करून लिहिलेली एक पुरोगामी संहिता आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन गोष्टींना इथे केंद्रस्थान आहे. समाजात वावरताना बोलणे, लिहिणे, व्यक्त करणे याबाबत ही घटना आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे सांगते. अशा वेळी एखादी गोष्ट पटली नाही, तर लोकशाहीमध्ये न्यायालयीन प्रक्रियाही आहे.
वादविवाद, आपल्या बाजूचा मतप्रवाह तयार करणे अशा सर्व बाबी करण्यासाठी इथे पुरेसा अवकाश आहे, जागा आहे. पुरोगामी विचार हा जातपातविरहित, भाषा, प्रांत, सीमा यांना उल्लंघून जाणारा, अखिल मानवतेचा, सुसंस्कृत आणि सहिष्णू विचार आहे. बालविवाह, सतीची चाल बंद करणे हा पुरोगामीच विचार होता. समाजातील विविध स्तरांची, दु:ख, वेदना, व्याकूळता असा मोठा परीघ पुरोगामी विचारांत आहे. वंचित, शोषितांचा विचार हा पुरोगामी विचारांचा गाभा आहे. आपापल्या धर्माचे आचरण करीत एकमेकांविषयी आदर ठेवणे हे पुरोगामी विचारांचे मूळ आहे. डॉ. दाभोलकर याच पाश्र्वभूमीवर सातत्याने पुरोगामी विचार मांडत होते. लोकांनी अज्ञानाने अथवा त्यांच्या फायद्याकरिता दाभोलकरांचे विचार नीट समजून घेतले नाहीत. ते हिंदुद्वेष्टे आहेत, धर्मबुडवे आहेत अशी हाकाटी केवळ अज्ञानातून आलेली आहे. त्यांचे विचार हे खरे तर आगरकर आणि गाडगेमहाराज यांच्या विचारांशी जवळीक साधणारे होते. विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, वैचारिक आचरण ही त्यांच्या विचारांची त्रिसूत्री होती.
डॉ. दाभोलकरांची महाराष्ट्रात, पुण्यात आणि शनिवार पेठेत खून व्हावा ही लांछनास्पद गोष्ट आहेच पण पुन्हा नव्याने विचार करायला लावणारी घटना आहे. याबाबत बटरड्र रसेल या विचारवंताचे एक वाक्य महत्त्वाचे वाटते, Fear is the main source of superstition and one of the main source of cruelty. To conqure fear is the begining of wisdom. (भीती हे अंधश्रद्धेचे मूळ आहे. या भीतीचे रूपांतर कधी कधी क्रौर्यातही होऊ शकते म्हणूनच भीतीवर मात करणे हीच शहाणपणाची सुरुवात आहे.) डॉ. दाभोलकरांनी मांडलेल्या पुरोगामी विचारांची भीती सोडून त्यांनी मांडलेले शोषणमुक्त विचार आत्मसात करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

No comments:

Post a Comment