संजय सोनवणी,
वर्ण आणि जातिव्यवस्था या सर्वस्वी वेगळ्या बाबी असून त्यांचा परस्परसंबंध नाही हे आपण मागील प्रकरणात पाहिले. प्रत्यक्षात मात्र समाजशास्त्रज्ञांनी वर्ण व जातिव्यवस्थेला एकत्रीत गृहित धरल्याचे दिसते. त्यामुळे जातिसंस्थेच्या उदयामागील कारणांचा नीटसा बोध होवू शकलेला नाही. येथे आपण सर्वप्रथम समाजशास्त्रज्ञांनी जातीची काय लक्षणे सांगितली आहेत हे पाहुयात.
१. अमरकोशात दिलेले जातीचे लक्षण आहे ते असे:
जातिर्जातं च सामान्यं व्यक्तिस्तु पृथुगात्मता I
याचा अर्थ असा कि जाती हा वर्गवाचक शब्द असून या वर्गातील प्रत्येक घटकाला व्यक्ति म्हनतात. आचारांच्या पृथुगात्मतेमुळे जे गट पडले आहेत त्यांना जाती ही संज्ञा दिलेली आहे.
२. सेनार्टच्या मते जात ही स्वयंपुर्ण संस्था असून तिचा एक पुढारी व एक सभा असते. जातित्व हे स्वेच्छेने प्राप्त होत नसून ते पुर्णपणे आनुवंशिक असते. एका जातीतील लोक साधारणपणे एकच धंदा करत असतात. रोटीबेटी व्यवहार, खाद्यपेयादी बाबी व शुद्धाशुद्धता याबाबतचे रुढ नियम पाळतात. जातीतील सामाजिक अपराध्यांना बहिष्कृत करणे इ. शिक्षा जातीलाच असतो.
ही वर्णनात्मक व्याख्या आहे हे उघड आहे.
३. डा. इरावती कर्वे यांच्या व्याख्येनुसार जातीची वैशिष्ट्ये म्हणजे विवाह फक्त जातेच्या आतच होतो. तिचा विस्तार बहुदा एका मर्यादित भागात व बहुदा एकभाषिक प्रदेशात असतो. जातीला पारंपारिक एक अथवा अधिक धंदे असतात.तिचे इतर जातींच्या अनुषंगाने उच्च अथवा नीच असे कमीअधिक स्थान असते. ज्या कुटुंबांत विवाहसंबंध होवू शकतो अशा कुटुंबसमुहालाच जात ही संज्ञा प्राप्त होत असल्याने, विस्तारलेला नातेवाईकांचा गट म्हणजे जात होय! जाती आणि जमातींत आश्चर्यकारक साम्य असून पंचायत व्यवस्था, मर्यादित भुभाग ई. साम्ये दोहोंत आहेत. त्यामुळे जाती या प्राचीन जमातींपासुन बनलेल्या आहेत.
जाती वर्णव्यवस्थेप्रमाने ईश्वरनिर्मित नाहीत हे मी आधीच्या भागात स्पष्ट केले आहेच. पुराव्यार्थ वसिष्ठसंहितेत (३.१) म्हटले आहे कि, "देशधर्म, जातिधर्म व कुलधर्म यांना श्रुतींचा आधार नसल्याने मनूने ते स्वत:च्या चिंतनातुन सांगितले आहेत. थोडक्यात जातीव्यवस्थेला मुळात धर्मसत्तेचा आधार नाही. एवतेव जातीव्यवस्था धर्माच्या पायावर टिकत नाही.
आता मी तत्पुर्वी दिलेल्या जातींच्या व्याख्यांकडे वळुयात.
जात ही आचारांच्या पृथुगात्मतेमुळे बनते असे अमरकोश म्हणतो. येथे त्याला आचार म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट नाही. आचारभेद ही मुळात कालसापेक्ष संकल्पना आहे. कालौघात समाजाचे आचारव्यूह बदलत असतात. काही नवीन निषिद्ध्ये निर्माण होत असतात तर कालची निषिद्ध्ये आज षिद्धांमद्धे मोडु लागतात. एका समाजाचे आचार निकट सन्निध्यामुळे, राजकीय/आर्थिक प्रभावांमुळे नकळत अन्य समाजघटकही स्वीकारत जात असतात. हे परस्पराभिसरण पिढ्यानुपिढ्या सुरु असते. वन्य आदिवासी जमाती व भटक्या जमाती फारतर आपले आचार दिर्घकाळ टिकवू शकतात असे म्हनता येईल...पण त्यांतही कधीतरी, सावकाश का होईना, बदल होतच असतो. त्यामुळे आचारांतील विभेदामुळे जाती बनल्या या मताला अर्थ रहात नाही.
सेनार्टची व्याख्या ही वर्णनात्मक व्याख्या आहे. जात ही स्वयंपुर्ण संस्था असते हे खरे आहे, पण ती मुळात निर्माण का झाली याचे उत्तर सेनार्टने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. जातीची स्वतंत्र पंचायत नेमकी का असते, राजसंस्थाही जातीअंतर्गत मामल्यांत जातपंचायत अथवा गोतसभेने दिलेल्या निर्णयांत ढवळाढवळ का करत नसे याचेही उत्तर सेनार्ट देत नाही. ही त्याने त्याच्या वर्तमानातील निरिक्षणावर आधारित बनवलेली ती व्याख्या आहे, पण ती प्रस्तूत चर्चेसाठी आपल्या कामी येत नाही.
डा. इरावती कर्वेंनीही तशे वर्णनात्मकच व्याख्या केली आहे. विवाह फक्त जातीअंतर्गत होणे हे एक जातीचे वैशिष्ट्य आहे हे खरेच आहे. जातीला पारंपारिक धंदे असतात हेही खरे आहे. पण त्यातुन जात-वास्तव आपल्याला समजते. पण ड. कर्वेंनी शेवटी केलेले विधान व ते म्हणजे कुटुंबसमुहांची, नात्यांची एकुण गोळाबेरीज म्हणजे जात...हे त्यांचे निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. पण त्याच वेळीस प्राचीनतम जमातींपासुनच जाती बनल्या हे त्यांचे विधान खोडुन काढणे भाग आहे.
खरे तर हे विधानच भोंगळ आहे. प्राचीन काळी सर्वच मानवी समाज हा विविध टोळ्यांत विखुरलेला होता. त्यांना आपण आज जमात म्हनतो. प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र जात बनली असे या विधानावरुन गृहित धरले तर मग प्रत्येक जातीत एकच जमातीचा समावेश अपरिहार्य असल्याने एकच जातीत श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या उतरंडी कशा निर्माण झाल्या याचे उत्तर मिळत नाही. एकच जमात एकच व्यवसाय घेवून देशभर विखुरली असेही मत मान्य करता येत नाही. अहिर जमातीचे उदाहरण मी आधीच्या भागात दिले आहेच. एकाच जमातीचे विविध जातींत विभाजन झाले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकाच जातीत अनेक मानववंश गट असल्याचे आपण पाहु शकतो. उदाहरनार्थ धनगर, वंजारी, ब्राह्मण, गवळी, सोनार, कोष्टी इइइइइ. त्यामुळे जमातींची जात बनलेली नाही असे स्पष्ट म्हनता येते.
जमातींपासुन जाती बनल्या असेही डा. कर्वेंचे म्हणने आहे असे गृहित धरले तर त्यांच्या विधानातील फोलपणा लगेच लक्षात येतो. मुळात भारतीय मानवी समाज हा पुरातन काली अगणित जमातींतच विखुरला होता हे म्हटल्यानंतर जाती बनायला विविध जमातींतीलच लोक येणार हे उघड आहे. जाती बनवायला माणसे कोठुन आणनार...आणि आणली तर मग जमातींचे काय होणार?
आपण येथेवर जातीव्यवस्थेबद्दलची महत्वपुर्ण विद्वानांची मते पाहिली.
या सर्वांनी गृहित धरलेय कि जणु काही या सर्व हजारो जाती मुळापासुनच होत्या! जात म्हणजे पारंपारिक आचारविशेषांचे उल्लंघन न करनारे सामाजिक गट म्हणजे जात! हे अत्यंत गंभीर असे चुकीचे गृहितक घेतल्याने मुळ प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्यप्राय असेच होते आणि तसे ते झालेही. आज ज्या जाती आहेत त्या सर्वच अवघ्या एक हजार वर्षांपुर्वीही अस्तित्वात नव्हत्या. दोन हजार वर्षांपुर्वी त्या अजुन सीमित होत्या. त्याच्याही मागे गेलो आपण तर लक्षात येईल कि जातींची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच होती. फारतर प्रादेशिक भाषाभेदामुळे नांवे वेगळी पडली असतील.
दुसरे असे कि जातपंचायत ही संस्था अत्यंत उत्तर-काळातील आहे. पुरातन काळी समाजपंचायत भरत असे. जातीनिहाय पंचायती अस्तित्वातच नव्हत्या. याचे कारण म्हणजे भारत हा पुरातन काळी गणराज्यव्यवस्था पाळत होता. नंतर समांतर काळी राजसम्स्था आली तरी तिचा परिघ मर्यादित प्रदेशापुरताच असे. मुळात ही गणराज्ये असोत कि राज्ये, ही विशिष्ट टोळ्यांचीच बनलेली असत. आणि त्या टोळीराज्यांतही जाती होत्याच हे आपण बौद्ध साहित्यातुन व्यापकपणे पाहु शकतो. या सर्वांचे निवाडे जातीपंचायती नव्हेत तर गणसभा वा राजसभा करत असे. ते तेंव्हा सहज शक्यही असे कारण राज्याचा मर्यादित भुगोल व जनसंख्या.
No comments:
Post a Comment