Thursday, 22 August 2013

एका संघर्षाची अखेर

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/-/articleshow/21947929.cms?
MAHARASHTRA TIMES, 21 AUG.2013
प्रतिमा जोशी 

आपले हितसंबंध जपणारी व्यवस्था शाबूत राहावी यासाठी राजसत्ता अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या तिन्ही सत्तांचा वापर करणारी माणसं नेमकी कशाला आणि कोणाला बाजूला सारू पाहतात याचं उत्तर शोधू गेलं तर या सत्ताचौकटींचंमुखवट्याआडचं अस्सल रूप ज्यांना दिसलं आणि ते इतरांच्या नजरेला आणून देण्याचा खटाटोप ज्यांनी आरंभला अशांना बाजूला सारलं. 

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्याकागदपत्रांचे आणि कायद्याच्या सुधारित मसुद्याचे भारे घेऊन मंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत खेटे घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता यापुढं विधानभवनाच्या आणि मंत्रालयाच्या वास्तूला दिसणार नाहीत. त्यांचे म्हणणे बुद्धीला तर पटते आहे मात्र राजकारणाच्या गाळात ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा नाही अशा धर्मसंकटातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंचित सुटका झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची आणि पर्यायानं डॉ. दाभोलकरांचीही परवड महाराष्ट्राने केली. मंगळवारी थंड डोक्यानं कट रचून केली गेलेली त्यांची क्रूर हत्या ही एकप्रकारे ​मनुष्यप्राण्याला माणूसपण देणाऱ्या विवेकाच्या आतल्या आवाजाचीच हत्या म्हणावी लागेल. 

डॉ. दाभोलकर यांना हा विवेकाचा आतला आवाज गेल्या चार दशकांपासूनच सतावत होता. स्वस्थ बसू देत नव्हता. दाभोलकरांच्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग असलेल्या या विवेकाचा समाजवाद हा चेहरा होता आणिमार्गाची प्रेरणा म. गांधींची होती. १० भावंडांमधील सर्वात धाकटे असलेले नरेंद्र यांची प्रकृती थोरले बंधु शिक्षणतज्ज्ञ देवदत्त शेतीतज्ज्ञ बंधु श्रीपाद दुसरे बंधु दत्तप्रसाद आणि दत्तप्रसन्न यांच्यापेक्षा काहीशी बंडखोरीची आणि कठोर चिकित्सेची. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यावर मिरजेच्या मेडिकल कॉलेजातून त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केलं. १२ वर्षं साताऱ्यातडॉक्टरकी केली. लौकिक अर्थानं पाह्यलं तर कोणाही मध्यमवर्गीयाला समाधान वाटेल असं आयुष्य आणि करिअर त्यांच्या हिश्श्याला आलं होतं. नुसती डॉक्टरकीच केली असती तरी लोकांनी नावाजलं असतंच... पैसाही मिळाला असता. 
१९७०चं दशक हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वादळ घेऊन आलं. दलित चळवळीची झंझावाती सुरुवात झाली होती. सत्यशोधक विचारधारा प्रमाण मानत समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणारे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या एक गाव एक पाणवठा मोहिमेने महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या जातीयतेचं विद्रुप रूप समोर येत होतं. विकासाच्या गंगेचा थेंबही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातील वंचित भूमिहिनांची गाऱ्हाणी मुखर करणारीआंदोलनं रुजू पाहत होती. अशा स्थितीत नरेंद्र दाभोलकर नावाचा एक तरुण निव्वळ डॉक्टरी करत सुखाचं आयुष्य जगणं शक्यच नव्हतं. आपली सुविद्य पत्नी वृंदा यांच्या हाती हॉस्पिटलचा पसारा सोपवून निश्चयानं तेसमाजपरिवर्तनाच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उतरले. एक गाव एक पाणवठा मोहीम ही त्यांच्या विचारांच्या अग्रक्रमांच्या कार्यपद्धतीच्या दृष्टीनं नेमकेपणा आणणारी ठरली. 

सातारा जिल्हा हा एका अर्थानं यशवंतराव चव्हाण प्रतापसिंह आणि अभयसिंहराजे भोसले अशा दिग्गजांचा जिल्हा. काँग्रेसचा बालेकिल्ला. समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांचे दलितांचे मजुरांचे ,भूमिहिनांचे स्त्रियांचे प्रश्न घेऊन सत्तेच्या या चिरेबंदीला भेदणं हे आव्हानाचंच काम होतं. डॉ. दाभोलकरांच्याच शब्दांत सांगायचं तर , ' शक्तिशाली निद्रिस्त सिंहाच्या अंगावर बागडणाऱ्या उंदरासारखी ही धडपड होती. मात्र हा उंदीर नंतर भलताच उपद्रवी ठरणार आहे याची जाणीव प्रस्थापितांना तेव्हापासूनच व्हावी इतका नेमकेपणा आणि आक्रमकपणा डॉक्टरांच्या मांडणीत आणि कार्यक्रमांतही होता. 

डॉ. आढावांबरोबर म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचं आणि विषमता निर्मूलन समितीचं काम पुढं रेटताना प्रतिष्ठानशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कार्याच्या पुढील दिशा स्पष्ट झाल्या. त्यात डॉक्टरांचा कल अंधश्रद्धा निर्मूलनाकडं झुकला आणि १९८३च्या सुमारास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चं काम महाराष्ट्रात सुरू झालं. 

सत्यसाईबाबांच्या चमत्कारांना आव्हान देणाऱ्या अब्राहम कोवूरांच्या चमत्कार खरे आहेत हे सिद्ध करा एक लाखाचं इनाम घेऊन जा ,' हे आवाहन त्यांनी राज्यभर तळमळीनं पोचवलं. आजतागायत हे आवाहन स्वीकारणारा माईचा लाल निघालेला नाही. पुरोगामी चळवळीच्या शिरस्त्याप्रमाणं समितीचं विभाजन झालं आणि १९८९पासून डॉक्टरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी चूल मांडली. कामाचा जोष आणि झपाटा मात्र कायम राहिला. नरबळी भानामती भूतप्रेत जादूटोणा याबरोबरीनंच आध्यात्मिक झुलीखाली झुलणारी आ​णि भक्तांना झुलवणारी बाबा आणि बापूगिरी यांचा पर्दाफाश समिती करत राहिली. या २५ वर्षांत डॉक्टरांनी तरुण उत्साही कार्यकर्त्यांची अफाट फौज जमवली. जिल्ह्याजिल्ह्यात तालुक्या-गावांत हे तरुण-तरुणी श्रद्धा ,अंधश्रद्धा भक्ती कर्मकांड यांवर आज निर्भीड विचार मांडत आहेत. चिकित्सा करत आहेत. 

हीच धर्मचिकित्सा डॉक्टरांच्या प्राणावर बेतली का निश्चित सांगणं अवघड आहे परंतु संशयाच्या सुया तिथंच वळत आहेत. ऑगस्ट २००२पासून त्यांनी अंधश्रद्धांना आवर घालणारा कायदा व्हावा या मागणीसाठी रान उठवायचं ठरवलं. कायद्याचं प्रारूप तयार करणं तांत्रिक गरजांनुसार त्यात बदल करणं आराखडा बनून विधेयकात त्याचं रूपांतर होईपर्यंत प्रबोधनाचे सर्व मार्ग चोखाळणं राजकीय पक्षप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचं मन या कायद्यासाठी अनुकूल करणं हे त्यांचं जणू मिशनच बनलं होतं. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज आपापतः किंवा हेतूतः पसरले/पसरवले गेले. विशेषतः वारकरी संप्रदायात त्याला मोठा विरोध निर्माण झाला. त्यांच्याशी आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्या सर्वांशी चर्चा करण्यात डॉक्टर कधी थकले नाहीत आणि हटलेही नाहीत. विविध दबावांमुळे या विधेयकात इतके बदल झाले की त्याचे नावही अखेर जादूटोणाविरोधी कायदा असं बदललं. 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. दाभोलकर नामोहरम झाले नव्हते. बोलू आणि मार्ग काढू अशी त्यांची तयारी असे. धर्म परंपरा कर्मकांड यांबाबत शांतपणं पण ठामपणं ते वादंगाला कायम तयार असत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यांच्यात फारच अस्पष्ट रेघ आहे... सबब फक्त अंधश्रद्धांचं निर्मूलन हे मृगजळ आहे असं मानणाऱ्या पुरोगाम्यांमधील जहाल गटांनी त्यांच्या भूमिकांवर बरेचदा टीका केली आहे. त्यांच्या मध्यममार्गाची खिल्लीही उडवली आहे. त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना दुरावले. या कशानेही विचलित न होता ते आपलं म्हणणं मांडत राहिले. 

मात्र अंनिस हीच त्यांची ओळख नव्हती. राष्ट्र सेवा दल असो महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणारा सामाजिक कृतज्ञता निधी असो साताऱ्यातील रयत शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन या संस्था असोत परिवर्तन हे व्यसनमुक्ती केंद्र असो की गेली सात वर्षं त्यांनी यशस्वीपणं सांभाळलेली साधना साप्ताहिकाची धुरा असो डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव त्यांच्या इतिहासात कुठं ना कुठं सापडत राहीलच. तुकड्यातुकड्यांनी चळवळी उभारत नाहीत टिकत नाहीत त्या समग्र प्रश्नाशी जोडून घ्यायला हव्यात हा त्यांचा आग्रह असे. कायम खादी वापरणाऱ्या डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातही या आग्रहाचे प्रति​बिंब वेगळ्या पद्धतीनं पडलेलं दिसेल... त्यांच्या मुलाचं नाव हमीद आहे हमीद दलवाईंशी असलेला डॉक्टरांचा स्नेह हे त्यांच्यातील बहुमुखी कार्यकर्त्याचंच प्रतिबिंब आहे. 

अशा या चर्चेला कायम तयार असणाऱ्या अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणाऱ्या समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणाऱ्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यममार्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना थ्रेट वाटत असतो हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

No comments:

Post a Comment