संजय सोनवणी,
धर्मसंस्था आणि जाती...
सततचे दुष्काळ आणि आक्रमक सत्तांनी भारतात जवळपास संपुर्ण राजव्यवस्था व अर्थव्यवस्थाही ताब्यात घेतल्याने व्यवसाय करणारे संकुचित होत आपापल्या व्यवसायांत अन्य कोणीही पडुन स्पर्धा निर्माण करु नये म्हणुन एक नवी व्यवसायव्यवस्था निर्माण कशी झाली हे आपण मागील लेखात पाहिले आहेच. जातीव्यवस्थेची निर्मिती धर्माने केली नव्हती हेही आपण पाहिले आहेच. असे असले तरी ही नवी व्यवस्था बनत असतांना धर्माची म्हणून काय भुमिका होती हे तपासून पाहणेही तेवढेच आवश्यक आहे. एखादी व्यवस्था कायम होते तेंव्हा त्या व्यवस्थेसाठी बळ देणारे धर्माचे अधिष्ठानही शोधले जाते कारण त्यातून एक भावनिक तत्वाधारही मिळत असतो. त्यातून व्यवस्था ही नियमीत होत जात असते.
आपण हिंदू धर्म हा वैदिक आणि मुर्तीपुजकांच्या दोन विचारधारांचे व व्यवस्थांचे संम्मिश्रण आहे हे मागे पाहिलेच आहे. वर्ण व्यवस्था ही वैदिक धर्माची देनगी आहे तर जातिव्यवस्था ही मुर्तिपूजक समाजाची देणगी आहे. दोन्ही व्यवस्थांत एक साम्य पुर्वी होते व ते म्हणजे दोन्ही व्यवस्थांत लवचिकता होती. वर्णबदल जसा सहज होता तसा जातीबदलही सहज होता. इतिहासात पाहिले असता असे दिसते कि वर्णव्यवस्था ही आधी जन्माधारीत बनली तर जातीव्यवस्था उत्तरकालात. संमिश्रणाच्या काळापूर्वीच वर्ण जन्माधारित बनले असल्याने व वैदिक धर्मशास्त्रकारांनी अन्य सर्व जातींना, त्या वर्णव्यवस्थेच्या चौकटीत बसवायच्या प्रयत्नांत जे वरपांगी वाटप केले त्यातून एक अनर्थकारक परंपरा सुरू झाली.
वैदिकांनी जरी वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार केला असला तरी तो व्यवहारात पाळला जाणे शक्य नव्हते. याचे कारण म्हणजे राजा क्षत्रीय वर्णाचाच हवा असा वैदिक हट्ट असला तरी प्रत्यक्षात शुद्र, वैश्य, ब्राह्मण हे राज्यपाट सांभाळण्यासाठी अयोग्य मानले गेलेले वर्णही सत्ताधारी बनतच राहिले. वैदिकेतर संस्कृती ही अधिक बलाढ्य आणि देशव्यापी असल्याने वैदिक धर्मशास्त्रे उपयूक्त ठरणेही शक्य नव्हते. त्यामुळे स्म्रुतींचे पालन प्रत्यक्षात समाजाने दहाव्या शतकापर्यंत तरी केल्याचे दिसून येत नाही.
वर्णाश्रम संस्थेत जातींना कसे सामावून घ्यायचे व जातींच्या उत्पत्तीची कशी मिमांसा करायची याबाबत फार मोठा गोंधळ दिसून येतो. यातून जी शक्कल लढवली गेली ती जातीसंस्थेला हानीकारकच ठरली. अनुलोम-प्रतिलोम विवाहांतून जो संकर होतो त्यातून विभिन्न जाती बनल्या असे स्मृतीकार सांगू लागले. त्यांच्या द्रूष्टीने जातींना वर्णव्यवस्थेत सामावून घेण्यासाठी जाती कशा बनल्या याची ही व्युत्पत्ती होती...परंतू ती अत्यंत अवैज्ञानिक आणि असंभाव्य आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. शूद्र पुरुषाने ब्राह्मण स्त्रीपासुन निर्माण केलेली संतती म्हणजे चांडाळ जातीचे लोक, शूद्राला क्षत्रीय स्त्रीपासून जी संतती होईल तो क्षत्ता जातीचा...अशा प्रकारे विविध वर्णांतील संकरातून जाती कशा बनल्या याचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु यात वास्तवता नव्हती व म्हणुन तिचा स्वीकारही झाला नाही. जाती या व्यवसायातुनच बनल्यात हे प्रत्यक्ष ज्ञान व भान होते. संकरातून जन्माला आलेली व्यक्ती स्वतंत्रपणे एक सर्वस्वी नवीन उद्योग शोधुन तो व्यवसाय करेल अशी शक्यताच नव्हती. व्यवसायाशी जाती संबंधित नसत्या व त्या केवळ वर्णसंकराने बनल्या असत्या तर संकर एवढे झाले आहेत कि लक्षावधी जाती बनल्या असत्या. त्यामुळे संकरातुन जाते बनल्या नसल्या तरी त्या सिद्धांताचे अल्पांश उपफल म्हणजे जातीअंतर्गत विवाह हाच सुरक्षीत व धर्ममान्य आहे असा समज मात्र समाजमनात क्रमश: रुजत गेला.
डा. अजय मित्र शास्त्री या संदर्भात म्हणतात कि "जाती अस्तित्वात येण्याची महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय हेच होय. परंतू जातींना पारंपारिक सामाजिक संरचेनेत कसे सामावून घ्यायचे या प्रश्नापोटी जातींच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्पष्टिकरणे तयार केली गेली." येथे पारंपारिक सामाजिक व्यवस्था म्हणजे वैदिक वर्णव्यवस्था होय.
धर्माने केलेले दुसरे अपकार्य म्हणजे "कर्मविपाक" सिद्धांताचा जन्म. हा सिद्धांत अकराव्या शतकापुर्वी समाजमनात रुढ नव्हता हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वजन्मीच्या पाप-पुण्यामुळे वर्तमान जन्मातील स्थिती प्राप्त होते असा हा सिद्धांत. आर्थिक अवनतीच्या काळात समाज दैववादी बनत असतो हे आपण आजही पहातो. ज्या संकतमय परिस्थितीचा उहापोह आपण गेल्या भागात केला आहे त्यावरुन आजचे दैन्य हे आपल्याच गतजन्मीच्या पापाचे फळ वाटणे अनैसर्गिक नाही. परंतु याचीच सांगड जातींशीही घातली गेली ती मात्र अत्यंत चुकीची व सर्वच समाजांवर अन्याय करणारी होती. जन्माधारित जातीव्यवस्थेला घट्ट करणारे होती. त्यामुळे परिस्थिती बदलू शकते या भानात भारतीय समाज कधीच आला नाही. व एकदा तात्कालिक स्थितीत बंदिस्त झालेली जातीव्यवस्था पुन्हा मूक्त झालीच नाही.
क्षत्रीय व वैश्य कोठे गेले?
वर्णव्यवस्थेची जातीव्यवस्थेशी सांगड घालण्याच्या प्रयत्नांत वैदिक व्यवस्थेला आधी अपयशच आल्याचे आपण पाहिलेच आहे. शूद्र-वैश्यही राजे होताहेत...सरंजामदार होताहेत हे चित्र वर्णाश्रमाशी जुळनारे नव्हते. राजे/सरंजामदार समतुल्य...मग जात-वर्ण (अगदी वंशही) कोणताही असो, अशा घराण्यांशी विवाहसंबंध निरलसपणे जोडत होते. सातवाहनांनी शकांशी, नागवंशीयांशी विवाहसंबंध जोडले होते. ब्राह्मनांनीही क्षत्रीय, वैश्य ते शूद्रांशी विवाहसंबंध जोडले होते. आतंरजातीय विवाहही मोठ्या प्रमानात होत असत.
क्षत्रीय हा लढवैय्यांचा/सत्ताधा-यांचा वर्ण असे असले तरी प्रत्यक्षात वर्णव्यवस्थेने ज्यांना शूद्र ठरवले असे कुणबी-धनगरादि लोकच सैन्यात मोठ्या प्रमानात असत. राजे अथवा सरदारही बनत असत. तीच बाब वैश्यांसाठी राखुन ठेवलेल्या व्यापाराची. यात जसे ब्राह्मनही पडत तसेच शुद्रही. त्यामुळे जाती व वर्णव्यवस्थेची सांगड बसणे जसे अशक्यप्राय होवू लागले तसा क्षत्रीय व वैश्य या वर्णाला डच्चू देण्यात आला व त्यासाठीही स्पष्टिकरणात्मक कथा बनवण्यात आल्या. त्यामुळे शेती हे वैश्य वर्णीयाचे काम ते शूद्र वर्णाकडे ढकलले गेले...म्हणजेच वैश्यालाही शूद्र मानण्यात आले. व वर्णव्यवस्थेत ज्यांचा समावेश करताच येत नव्हता अशा समाजवर्गाला पाचवा वर्ण मनूस्मृतीनुसार मुळात अस्तित्वात नसतांनाही निर्माण करण्यात आला. यातुन वैदिक व अवैदिक व्यवस्थेचे परिपुर्ण मिलन होण्याऐवजी विसंवादच निर्माण झाला. जातीव्यवस्था अधिक प्रबळ होत गेली व वर्णाश्रम धर्म हा अत्यंत सीमित झाला, परंतू वेदमहत्ता व प्रामाण्य याला अतिरेकी महत्व आल्याने प्रत्यक्ष ब्राह्मण समाज वगळता अस्तित्वातच न राहिलेल्या वर्णव्यवस्थेचे गारुड मात्र वाढत गेले व त्यातुनच वर्णव्यवस्थेने शूद्र ठरवून टाकुनही उच्चवर्णाशी आपापल्या जातींची नाळ भिडवायची एक अनिष्ट प्रथा बाराव्या-तेराव्या शतकानंतर सुरु झाली. यामागचे मानसशास्त्रही तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याआधी आपण अन्य कारणांचाही शोध घेवूयात.
बौद्ध धर्माचा परिणाम...
भारताचा समाजेतिहास पाहतांना आपण आपली आजची व्यवस्था नेमकी अशीच का आहे याचा विचार करत असतांना बौद्ध धर्माचा उदय, देशव्यापी प्रभाव आणि दहाव्या शतकापर्यंत झालेला जवळपास -हास याचा कधीही विचार करत नाही. येथे बौद्ध तत्वज्ञानाचा उहापोह मला अभिप्रेत नसून देशातील जवळपास ६०-७०% जनता एकतर बौद्ध तरी झाली होती अथवा बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रचंड प्रभावाखाली गेली होती त्या जनतेचे बौद्ध धर्माचा अस्त झाल्यानंतर, पुन्हा आपल्या मुळच्या धर्मात परत यावे लागल्यानंतर त्यांचे धार्मिक स्थान नेमके काय झाले असेल यावर आजतागायत कोणत्याहे समाजशास्त्रज्ञाने विचार केलेला दिसत नाही. परंतु भारतीय समाजजीवन व भावजीवनावर प्रभाव टाकणारा हाही एक घटक आहे हे विसरुन चालणार नाही.
भारतात सुमारे दीड हजार वर्ष बौद्ध धर्माने भारतावर फार मोठा प्रभाव गाजवला. सम्राट अशोकापासून हर्षवर्धनापर्यंत त्या धर्माला आधार देनारे राजे-महाराजे होवून गेले. जे राजे बौद्ध नव्हते असे (उदा. सातवाहन) बौद्ध धर्माचे उदार आश्रयदाते बनले. देशभरात हजारोंच्या संख्येने बौद्ध विहार, स्तूप, लेणी तर उभारली गेलीच, पण नालंदासारखी किमान सहा बौद्ध विश्वविद्यालयेही उभारली गेली. या काळात बहुसंख्य समाज हा बौद्ध धर्माचा अनुयायी बनला होता. आठव्या शतकापासून मात्र या धर्माला भारतात उतरती कळा लागू लागली. त्याची नेमकी कारणे काय या चर्चेत येथे जायचे नसून तेराव्या शतकापर्यंत हा धर्म भारतातुन जवळपास नष्ट झाला हे वास्तव लक्षात घ्यायचे आहे.
जवळपास हजार वर्ष समाजातील मोठा वर्ग बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या वा अनुयायी म्हणुन प्रभावात असलेल्या व्यक्तीघटकांना जेंव्हा पुन्हा स्वगृही परतावे लागले तेंव्हा त्यांचे सामाजिक व धार्मिक स्थान नेमके काय राहिले असेल? माझ्या मते समाजेतिहासातील हा एक कळीचा मुद्दा आहे. बौद्धजन धर्मांतरीत होवून हिंदू बनले नाही. अथवा तशी पद्धतही अस्तित्वात नव्हती. लोक आपापल्या मुळ श्रद्धांकडे परतले असे मात्र म्हणता येईल. परंतू या प्रदिर्घ काळात जे सातत्याने परंपरेने बौद्ध होते, बौद्ध तत्वज्ञान व मित्थकांच्या प्रभावाखाली होते त्यांना त्यांच्याच किती मुळ परंपरा माहित होत्या?
बौद्ध धर्मातील भिक्खु संघात जातीभेद नव्हता हे खरे असले तरी सामाजिक व्यवस्थेतील जातीव्यवस्थेला विरोध नव्हता. तेंव्हा जातीसंस्था लवचीक असल्याने तात्विक विरोधाची आवश्यकताही नव्हती. वर्णव्यवस्थेबाबतची गौतम बुद्धांची मते विख्यातच आहेत. जन्माधारीत वर्णव्यवस्थेला त्यांचा विरोधच होता.
परंतू बौद्ध झालेले कोनत्या ना कोणत्या जातीशी संबंधित होते. कोणी कुनबी तर कोणी कुंभार. बौद्ध परंपरा सोडुन जेंव्हा त्यांनी आपल्या मुळ श्रद्धांकडे परत यायला सुरुवात केली तंव्हा त्यांचे स्वागत नेमके कसे झाले याबाबत एकही ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही. ही स्वगृही परत यायची घटना एकाच वेळीस घडलेली नसून क्रमश: होत गेलेली आहे हे तर स्पष्टच आहे. बौद्ध धर्मात वर्णव्यवस्था नसल्याने वर्णाश्रमवाद्यांनी त्यांचा समावेश शूद्र वर्णात केला हे मात्र ठामपणे म्हणता येते. कारण या काळात मुळात क्षत्रीय/वैश्य हे वर्णच बाद केले गेलेले होते. शूद्र वर्णात समावेश केला गेला याचे नवल नाही वा त्यामुळे सामाजिक फरक पडला असेल असे नाही. पण शूद्रांना हीनत्व देणे मात्र सोपे गेले. ज्या बौद्धांचा पराकोटीचा तिरस्कार ज्या व्यवस्थेने केला त्यांच्याकडे पाहण्याचा दुषित दृष्टीकोण यामागे असणे स्वाभाविक वाटते. त्यामुळे व्यवस्थेत सावकाश का होईना पण जातीघटकांना हीणत्व देत देत त्यांची मानसिकता धर्मशरण बनवली गेली असे वाटते. अर्थात याचा फटका सर्वच व्यावसायिक जातींना बसला. यामागे समकालीन आधी वर्णित केलेली विवाहसंस्था, दुष्काळ, ढासळलेली अर्थव्यवस्था, इस्लामी आक्रमणे ई. कारणेही हातात हात घालुन होतीच.
या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणुन संपुर्ण देशाचीच एक मानसिकता बनणे स्वाभाविक होते. ब्राह्मणांनी या बदललेल्या व्यवस्थेचा स्वार्थासाठी वापर केला असा आरोप करता येतो व तो काही प्रमाणात खराही आहे. ब्राह्मण जवळपास साडेपाचशे जातींत विभागले गेले असले तरी वर्णही ब्राह्मण व जातही ब्राह्मण असे सलगीकरण करणे त्यांना अधिक सोपे गेले.
तरीही जाती-जातींत उच्च-नीचतेचा भाव कसा आला याचे उत्तर आपल्याला शोधणे भाग आहे. जातीव्यवस्थेची ही फार मोठी शोकांतिका आहे. वर्णवर्चस्वाच्या तत्वज्ञानातून जातीश्रेष्ठतेची जाणीव विकसीत झाली कि अन्य कोणते समाज-मानसशास्त्र त्यामागे काम करत होते हे आपल्याला पुढे पहायचे आहे....ते पुढील भागात.
No comments:
Post a Comment